Breaking News

नवी मुंबईतील नागरी समस्या सुटणार

आमदार गणेश नाईकांच्या सूचनेप्रमाणे होणार कामांची पडताळणी
नवी मुंबई : बातमीदार
आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नवी मुंबईतील सर्वच्या सर्व 111 प्रभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि समाजसेवकांनी प्रभागनिहाय आवश्यक समस्या आणि नागरी कामांची लेखी निवेदने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे सादर केली. या वेळी लोकनेते आमदार नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे या सुचविलेल्या सर्व कामांची पडताळणी करून प्रस्ताव तयार करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त नार्वेकर यांनी दिले.
या बैठकीस ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी उपस्थित होते.
काही प्रभागांमध्ये तब्बल 100 कोटींची कामे करण्यात आली तर काही प्रभागांमध्ये 50 लाखांची कामे देखील झालेली नाहीत याकडे आ. नाईक यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. सर्वच प्रभागांना समान न्याय मिळायला पाहिजे यासाठी 111 प्रभागातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे हाती घेऊन त्याचे प्रस्ताव तयार करण्याची सूचना लोकनेते नाईक यांनी आयुक्तांना केली. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता,दळणवळण इत्यादी सुविधांची कामे सुचविण्यात
आली आहेत.
लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वन टाइम प्लॅनिंग संकल्पनेनुसार नवी मुंबईतील अन्य नोड देखील विकसित करावेत. प्रत्येक नोडवर पन्नास कोटी रुपये अशी पाचशे कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने करावी अशी सूचना आ. नाईक यांनी केली असता त्याला आयुक्त नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
बारवी धरणातून नवी मुंबई शहराला ठरल्याप्रमाणे पाणीसाठा मिळतो का? ही बाब तपासण्याची मागणी आ. नाईक यांनी आयुक्तांकडे केली. नवी मुंबईला किती पाणीसाठा मिळतो अन्य शहरांना किती पाणीसाठा मिळतो? याची माहिती देखील घेण्याचे सुचित केले.
महापालिकेच्या सीबीएससी शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी असते परंतु या शाळांमधून शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी आ. नाईक यांनी केली असता त्याला आयुक्त नार्वेकर यांनी होकार दर्शवला. आरोग्य खात्यातही आवश्यक कर्मचारी वर्ग भरती करण्याची सूचना केली.
पाणीवापर मोजण्यासाठी महापालिकेने जलमापके बसवली आहेत. परंतु अनेक ठिकाणी ही जलमापके एक तर नादुरुस्त झाली आहेत किंवा ती चोरीला गेली आहेत. अशा ठिकाणी नागरिकांनीच खर्च करून ती जलमापके आणून देण्याचा तगादा महापालिकेने लावला आहे. अशा जलमापकांचा आर्थिक भुर्दंड नागरिकांवर लादू नका तर पालिकेने स्वखर्चाने ही जलमापके बसवून द्यावीत, अशी मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी या बैठकीत केली.
महापालिकेतील काही अधिकारी दबंगगिरी करून स्थानिक आणि भूमिपुत्र ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. अधिकारी त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देत आहेत. अधिकार्‍यांची ही गुंडगिरी सहन करणार नाही असा इशारा देतानाच नवी मुंबईच्या विकासामध्ये प्रसंगी तोटा सहन करून योगदान देणारे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना महापालिकेच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्याची मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी आयुक्तांकडे केली.
ट्रान्स हार्बर मार्गावर सुरक्षितपणे रूळ ओलांडण्यासाठी आजही अनेक ठिकाणी स्काय वॉक नाहीत. हा परिसर जरी रेल्वेच्या अखत्यारीमध्ये असला तरी देखील नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने स्कायवॉक बांधावेत, अशी महत्त्वाची सूचना लोकनेते नाईक यांनी केली. नवी मुंबईतील रेल्वे स्थानके व परिसर पालिकेने देखभालीसाठी स्वतःकडे घ्यावा. या बाबींसाठी येणारा खर्च या विभागातील जाहिरात हक्क वापरून काढावा, असेही ते म्हणाले. खैरणेमध्ये अशाच प्रकारे स्काय स्कायवॉकची आवश्यकता आहे. रूळ ओलांडताना आजही या ठिकाणी अपघात होत आहेत. माजी खा. संजीव नाईक यांनी सुचित केलेले खैरणे रेल्वे स्थानक महापालिकेने बांधावे आणि त्या मोबदल्यात या स्थानकाचे संपूर्ण अधिकार स्वतःकडे घ्यावेत, अशी मागणी देखील आ. नाईक यांनी केली आणि त्याकरता राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे
नमूद केले.

प्रकल्पग्रस्त व अन्य कर्मचार्‍यांना तत्काळ कायम करा
अलीकडेच महापालिका प्रशासनाने बारवी धरण प्रकल्पग्रस्तांना तत्परतेने महापालिकेच्या सेवेत कायम केले, परंतु नवी मुंबईतील सिडको आणि एमआयडीसीचे 131 प्रकल्पग्रस्त अद्यापही कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या कर्मचार्‍यांना तातडीने कायम करावे. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण साफसफाई आणि अन्य खात्यातील ठोक मानधन तत्वावर काम करणारे तसेच अन्य संवर्गातील कर्मचार्‍यांना देखील कायम करण्याची आग्रही मागणी आमदार नाईक यांनी केली.

 

 

Check Also

स्त्री शक्ती फाउंडेशनचा भाजपला पाठिंबा

अपक्ष उमेदवार विजया कदम यांची अधिकृत घोषणापनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील कळंबोली प्रभाग …

Leave a Reply