
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
बँक ऑफ इंडिया नवी मुंबई विभागीय कार्यालया तर्फे बुधवारी (दि. 14) रबाळे, नवी मुंबई येथे महा ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. उद्योजक, व्यायसायिक, व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील 200 पेक्षा अधिक ग्राहक या वेळी उपस्थित होते. नवी मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक विश्वजीत सिंह यांनी आपल्या भाषणात 1969 साली राष्ट्रीयीकरण झालेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची भूमिका स्पष्ट केली आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत, तसेच महिला व दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणात योगदान अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, भारत सरकारने पुढील पाच वर्षात पाच लाख कोटी डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. श्री. सिंह यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की, राष्ट्रीयीकृत बँका देशाची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत करायला पूर्णपणे सज्ज आहेत. सरकारी बँका नेहमीच भारताच्या प्रगतीत सक्रिय भागीदार म्हणून राहिल्या आहेत. या वेळी सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजना, पीएसबी ऑनलाईन लोन, स्टँड अप इंडिया, मुद्रा, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वित्तीय समावेशन, डिजिटल अर्थव्यवस्था यावर सादरीकरण करण्यात आले. शेवटी उपविभागीय व्यवस्थापक रोमेश मिराखुर यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper