चरित्रपट अर्थात बायोपिक हे सर्वात कसोटीचे, कौशल्याचे, कसब असलेली निर्मिती. भरपूर मेहनत घ्यायची तयारी हवी.
ज्याचं चरित्र (वा आयुष्य) मांडायचयं तसं दिसण्यापासून हे आव्हान सुरू होते. आज मेकअपचं तंत्र विकसित झाले आहे, व्हीएफएक्स रुळलयं, एआय ने बरेच काही साध्य होतेय. जुना काळ ग्राफिक्सने उभा करता येतोय. पण त्या कलाकाराला ती व्यक्ती साकारताना बरेच भान ठेवावेच लागते. कारण तुलना होणे हे स्वाभाविक आहेच. मिलन लुथरिपा दिग्दर्शित डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालनने सिल्क स्मिताचे वादळी आयुष्य साकारले, पण ती तीक्ष्ण नजर दाखवता आली नाही. तीच तर सिल्क स्मिताची खरी ओळख.
आता कियारा अडवाणी मीनाकुमारी साकारणार म्हटल्यावर तर जास्तच प्रश्न पडतात. दिग्दर्शक कमाल अमरोही व मीनाकुमारी या पती व पत्नीच्या नात्यावर फोकस टाकणारा कमल और मीना हा चरित्रपट बनतोय. त्यात मीनाकुमारीचे अभिनेत्री असणे जास्त महत्वाचे.
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अतिशय संवेदनशील अभिनेत्री मीनाकुमारी कदाचित माहित नसेल. अथवा आजच्या प्रथेनुसार त्यांनी एव्हाना गुगलवर जात मीनाकुमारीची माहिती व फोटो यावर नजर टाकलीही असेल. मीनाकुमारी पाह्यची तर रुपेरी पडद्यावर. (गुगलवर संदर्भ, माहिती व तपशील सापडतील, मीनाकुमारीचे अष्टपैलुत्व दिसणार नाही.)
पन्नास व साठचे दशक हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ. त्यात नर्गिस, मीनाकुमारी व मधुबाला या सर्वोत्कृष्ट तीन लोकप्रिय अभिनेत्री. अष्टपैलू व अभिनयनिपूण. अनेकदा नायकांनाही भारी पडत. मीनाकुमारी ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखली गेली. खरं तर ती अष्टपैलू. पण त्या काळात लोकप्रिय चित्रपटातील भूमिकेनुसार कलाकार प्रतिमा (इमेज) चिकटली जाई. मग वाट्याला त्याच स्वरुपाच्या भूमिका येत. मीनाकुमारीच्या अनेक भूमिका गाजल्या. विजय भट्ट दिग्दर्शित बैजू बावरा (1952) मधील गौरी, बिमल रॉय दिग्दर्शित परिणिता मधील शीर्षक भूमिका, बी. आर. चोप्रा दिग्दर्शित चांदनी चौक या मुस्लिम सोशल चित्रपटातील झरीना, श्रीमुलू नायडू दिग्दर्शित आझाद (1955) मधील शोभा, आर. सी. तलवार दिग्दर्शित मेमसाब (1956) मधील शीर्षक भूमिका, एल. व्ही. प्रसाद दिग्दर्शित शारदा ( 1957) मधील शीर्षक भूमिका, देवेंद्र गोयल दिग्दर्शित चिराग कहा रोशनी कहा (1959) मधील रत्ना, किशोर साहू दिग्दर्शित दिल अपना और प्रीत पराई (1960) मधील करुणा, फणी मुजुमदार दिग्दर्शित आरतीमधील आरती, श्रीधर दिग्दर्शित दिल एक मंदिर मधील सीता, ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित सांज और संवेरा ओ. पी. रल्हन दिग्दर्शित फूल और पत्थर गुलजार दिग्दर्शित मेरे अपने (1971) मधील आनंदी देवी, दुलाल गुहा दिग्दर्शित दुश्मन मधील वृध्दा, कमाल अमरोही दिग्दर्शित पाकिजा (1972) मधील साहिबजा….अबब, एकाच कारकिर्दीत असा जबरदस्त परफॉर्मन्स. यातील पन्नासच्या दशकातील सगळेच आणि साठच्या दशकातील सुरुवातीचे चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट आहेत. या प्रवासात त्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या दिग्दर्शकांनी मीनाकुमारीच्या अफाट गुणवत्तेला वाव दिला. अभिनय प्रशिक्षण केंद्रात मीनाकुमारीचे काही चित्रपट अभ्यासक्रमात हवेत. बरेच काही शिकता येईल. कियारा अडवाणीने हे सगळेच चित्रपट पाहिले तर तिला मीनाकुमारी साकारणे म्हणजे काय हे समजेल.
पाकिजा निर्मितीच्या काळातच मीनाकुमारीचे आजारपण बळावले. त्यामुळेच काही लॉन्ग शॉटस तिच्या डबलवर चित्रीत करावे लागले. चित्रपट पूर्ण झाल्यावर मुंबईत चार फेब्रुवारी 1972 रोजी प्रदर्शित झाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, पाकिजा एकाच वेळेस दक्षिण मुंबईतील रिगल, लिबर्टी व मराठा मंदिर या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. मराठा मंदिर हेच त्याचे मुख्य चित्रपटगृह. तेथील भव्य दिमाखदार डेकोरेशनपासूनच पाकिजा चर्चेत. पण फर्स्ट शोपासूनच पब्लिक रिपोर्ट नरम. गाणी लोकप्रिय असल्यानेच चित्रपट तग धरुन होता, अशातच 31 मार्च 1972 रोजी मीनाकुमारीचे निधन झाले. या धक्क्यातून सहानुभूतीची लाट निर्माण झाली. पाकिजा ची गर्दी हळूहळू वाढू लागली. चित्रपट सुपर हिट ठरला आणि मराठा मंदिर चित्रपटगृहात पाकिजा ने तब्बल पन्नास आठवडे मुक्काम केला. ही एक प्रकारची मीनाकुमारीला श्रद्धांजलीच.
मीनाकुमारीच्या खाजगी आयुष्याचीही कायमच बरीच उलटसुलट चर्चा झाली. गॉसिप्स रंगले. त्यात कमाल अमरोही यांच्यासोबतच्या नात्यावर कायमच फोकस पडतो. तिचं व धर्मेंद्रचे संबंध कुतूहल निर्माण करणारे. तिचं पेयपान देखील चर्चेचा विषय. त्यावर अनेक किस्से. चरित्रपटात त्यातलं काय असणार वा दिसणार? चरित्रपटात खाजगी आयुष्यातील गोष्टी दिसाव्यात ही सर्वसाधारण अपेक्षा. गॉसिप्स मॅगझिनमधून जे आलं, दिसलं, सांगितले गेले, त्या पलिकडे जाऊन आणखीन बरेच काही असतेच असते. ते सांगण्या वा मांडण्यासाठी आत्मचरित्र हे माध्यम असते. काही कलाकार आपल्या आत्मचरित्रातून आतापर्यंत जगासमोर न आलेल्या गोष्टी आत्मचरित्रात लिहितात ( ते लिहिताना आपणच बरोबर होतो हे ठसवतात हा मानवी स्वभाव). तर काही कलाकार आपल्या आयुष्यातील खाजगी गोष्टी आपल्याच पाशी रहाव्यात म्हणून आत्मचरित्र लिहित नाहीत. चरित्रपट हे एक प्रकारचे आत्मचरित्रच. माध्यम वेगळे.
पण त्या कलाकाराची (वा खेळाडू, राजकीय नेता वगैरे असेल) भूमिका आता अन्य कोणी साकारते.
मीनाकुमारी चरित्रपटाची निर्मिती सिध्दार्थ मल्होत्रा ( कियारा अडवाणीचा पती), सारेगामा व अमरोही कुटुंब हे मिळून करताहेत. दिग्दर्शन सिध्दार्थ मल्होत्रा करणार आहे. आता फक्त कियारा अडवाणी ही भूमिका साकारणार एवढेच निश्चित झालेय. अजून पटकथालेखन, अन्य कलाकार अशा अनेक गोष्टींसह चरित्रपटाचे नाव निश्चित व्हायचेच. चित्रपटात कमाल अमरोही कोण साकारणार? धर्मेंद्रची व्यक्तिरेखा असेल तर ती कोणाला देणार? पन्नास व साठच्या दशकाचा काळ उभा करण्यात कला दिग्दर्शक यशस्वी ठरेल ना? अंधेरीतील महाकाली येथील कमालीस्तान स्टुडिओत त्यासाठी सेट लावावे लागतील. अशा अनेक गोष्टींसह हा कमल और मीना चरित्रपट पडद्यावर येईल. पण केव्हा हे आत्ताच सांगता येत नाही. कारण आव्हान प्रचंड मोठे आहे. चित्रपट आणि त्यातील गीत संगीत या रुपाने मीनाकुमारीचा प्रवास सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह ते आज ओटीटी असा झाला असला तरी मीनाकुमारी साकारणे सोपे नाही. विशेषत: भावनिक दृश्यातील मीनाकुमारी जास्त प्रभावी होती. ते तिच्या डोळ्यात दिसे, उच्चारातून दिसून येई. त्यात खरेपण वाटे. तेच तात्कालिक समिक्षक व रसिकांना भारी वाटे.
कियारा अडवानीला आंतर्बाह्य बदलावे लागेल. ती काहीशी हेमा मालिनीसारखी दिसते. तिचं सोशल मिडियातील ग्लॅमरस रुप ती चित्रपटासाठी बाजूला ठेवू शकेल. ते करावेच लागेल. ती मीनाकुमारी कशी काय दिसेल हा मात्र प्रश्न आहे, त्याबाबत कुतूहल नक्कीच आहे….या चरित्रपटातून मीनाकुमारीसारख्या एका गुणी अभिनेत्रीची अष्टपैलू अभिनय क्षमता व दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे तिच्या आयुष्यातील स्थान या गोष्टींसह जुन्या काळातील चित्रपटाचे जग, मानसिकता, दृष्टिकोन, एकमेकांशी असलेले संबंध, भावनिक नाते अशा अनेक गोष्टी आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर येतील…
चित्रपट इतिहासातील नर्गिस, मधुबाला, बलराज साहनी, पद्मिनी, मा. भगवानदादा, दारासिंग यांच्यावरील चरित्रपट माईलस्टोन ठरतील. पण त्या भूमिका साकारण्याच्या ताकदीचे कलाकार खरंच आहेत का याचे उत्तर कोणाकडे आहे? त्यापेक्षा भरपूर संशोधन करुन माहितीपट (डॉक्युमेंटरीज) बनवल्या तर? अशा कलाकारांच्या जुन्या चित्रपटांचे फूटेज, त्यांच्या संबंधित व्यक्ति यांच्या भेटीगाठी, जुन्या काळातील नियतकालिकातील कात्रणे यातून ते शक्य होत जाईल. आणि ते जास्त प्रभावीही ठरेल. त्याचीच तर गरज आहे.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper