Breaking News

घोडीवलीतील महिला दारूबंदीसाठी आक्रमक ; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या घोडीवली कांढरोली गावात असणार्‍या दिवासीवाडीत छुप्या मार्गाने गावठी दारू विक्री सुरू असल्याने अनेक जण व्यसनाधीन झाले आहेत. यातून पुढील पिढी वाममार्गाला लागू नये यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी दारूबंदीबाबत खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे

घोडीवली आदिवासी वाडीत गावठी दारूचे किमान सात ते आठ धंदे असून सकाळी व सायंकाळी वाडीत व जंगल भागात दारू विक्री केली जाते. या ठिकाणी याआधी अनेक दारूचे धंदे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत व गुन्हेही दाखल केले, मात्र तरीही काही ठिकाणी छुप्या मार्गाने अद्याप दारूची विक्री होत असल्याने या भागातील लोक दारूच्या आहारी जाऊन काहींचे मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा या व्यावसायिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करावी यासाठी गावातील महिला, ग्रामस्थ व तरुणांनी एकत्रित येऊन खालापूर पोलीस ठाण्यात निरीक्षकांकडे

निवेदन दिले.

या वेळी माजी सरपंच रोहिदास पिंगळे, महेश पिंगळे, अंकुश पिंगळे, नवज्योत पिंगळे, संजीवनी पिंगळे ,सोनी येरूणकर, सुषमा पिंगळे, सपना पिंगळे, प्रीती पडोकर, पल्लवी पिंगळे, अविनाश फराट, निखिल पिंगळे, हर्षद पिंगळे, हितेश पिंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी सर्वांनी एकमुखाने दारूबंदीचा निर्धार व्यक्त केला.

– घोडीवली हा जंगलव्याप्त ग्रामीण भाग असल्याने या ठिकाणी आदिवासी बांधव दारू विक्री करीत असतात. त्यामुळे येथील नागरिकांसह तरुणवर्गही काही प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाऊ लागला. काही लोक या गावठी दारूमुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्यात. ते पाहता दारूची विक्री बंद व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

-संजीवनी पिंगळे,

अध्यक्ष, महिला बचत गट

– गावठी दारूभट्टी व विक्रीबाबत पोलीस यंत्रणा सतर्क आहे. यासंबंधी सतत कारवाई केली जाते. तरीही निवेदनानुसार घोडीवली व परिसरात असा व्यवसाय सुरू असेल, तर त्वरित कारवाई केली जाईल.

-विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खालापूर

Check Also

पनवेल महापालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय

शेकाप महाविकास आघाडीचा पुन्हा पराभवपनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, …

Leave a Reply